पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे उभारण्यात आलेल्या श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी महापालिकेने चक्क रस्त्यावरच मंडप उभारला आहे. त्यामुळे भक्ती शक्तीकडून प्राधिकरण, रावेतकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
याशिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणीच अनधिकृत जाहिरात फलक कुठल्याही सुरक्षेविना उद्यानाच्या सीमाभिंतीला लावला आहे. पावसाचे दिवस आणि त्यात जोरदार वाऱ्यामुळे हा फलक अपघाताला निमंत्रण देतायत. किवळे परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेचा पालिकेने अजूनही बोध घेतला नाही का? पालिका आयुक्त अशा बेजबाबदार वृतीला पाठीशी घालतातच कसे?, अशी कुजबुज नागरिक करीत आहेत.




