पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे पहिल्या नियमित प्रवेश फेरीत 25 हजार 987 विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही या फेरीतील 16 हजार 521 जागा रिक्तच पडल्या आहेत.
पुणे विभागातील 324 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 13 हजार 390 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यात कॅपअंतर्गत 88 हजार 485, कोटाअंतर्गत 24 हजार 905 जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी 93 हजार 465 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून यातील 81 हजार 513 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-1 भरून लॉक केले. 38 हजार 419 अर्ज ऍटोव्हेरीफाईड करण्यात आले आहेत. मार्गदर्शन केंद्राद्वारे 42 हजार 221 अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. 65 हजार 995 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविलेले आहेत.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीत 42 हजार 239 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. कॅपअंतर्गत 22 हजार 156 तर कोट्याअंतर्गत 3 हजार 831 याप्रमाणे विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश निश्चित केले आहेत. विविध कोट्याअंतर्गत 25 हजार 412 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यात इन-हाउससाठी 8 हजार 742 पैकी 2 हजार 486, अल्पसंख्याकसाठी 12 हजार 223 पैकी 1 हजार 262, व्यवस्थापन कोट्यातील 4 हजार 447 पैकी 83 जागांवरच प्रवेश निश्चित झालेले आहे.
शासनाकडून नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती, हमीपत्र यावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.




