आळंदी (वार्ताहर) : आगामी लोकसभा निवडणुकीत महेशदादा सारखा पैलवान लोकसभेत पाहिजे तसेच लोकसभेत अर्थसंकल्प पाहताना मला माझ्या शेजारी महेशदादाला बसायला पाह्यला आवडेल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आळंदी येथे जाहीर सभेत बोलताना सांगितले. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा करत भोसरी आमदार महेश लांडगे यांना थेट शिरूर लोकसभा मैदानात उतरवून याचे निश्चित केले असल्याचे समोर येत आहे.
काही दिवसापूर्वी भाजपने राज्यातील सर्व 48 लोकसभा प्रचार प्रमुखांची निवड केली. यामध्ये शिरूर लोकसभेच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी महेश लांडगे यांच्या खांद्यावरती दिली आहे. पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही लोकसभा प्रचार प्रमुखांनाच आगामी लोकसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाईल असे सुचित केले होते. त्यानंतर आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनीही महेश लांडगे हे शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असावा असे म्हटल्यामुळे भाजपकडून शिरूर लोकसभेसाठी जोरदार फिल्डींग लावली जात आहे.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोदी@9 महाजनसंपर्क अभियानामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे’, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. आळंदी येथील रसिकलाल धारीवाल सभागृहात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे देशभर मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, प्रदिप कंद, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, आशा बुचके, जयश्री पलांडे, विकास डोळस, संजय घुंडरे, वैजयंता कांबळे, शांताराम भोसले, बंडू नाना काळे, शिरीष कारेकर, श्यामराव गिलबिले,प्रिया पवार, कोमल काळभोर-शिंदे, माऊली बनसोडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते




