पुणे : जमिनीच्या व्यवहारातील वादातून पत्रकारावर गोळीबार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी बेंगळुरूमधून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा अल्पवयीन मुलांसह १३ जणांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून जीवे मारण्याची सुपारी देऊन गुन्हा घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
श्रेयस अप्पा मते (वय २१, रा. नांदेड, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मते याला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक शनिवारी पुण्यात पोहोचले. मते आणि त्याच्या साथीदारांनी सुपारी घेऊन हल्ला केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे (वय २०, रा. दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड) अशी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर ११ जून २०२३ रोजी स्वारगेट भागातील महर्षीनगर परिसरात गोळीबार करण्यात आला होता. त्यापूर्वी डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. सिंहगड रस्त्यावरील जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मते याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.




