पिंपरी : कस्पटेवस्ती येथील मनपा शाळेच्या शेजारी कचरा व राडातोडा पडलेला असल्याने पहिल्याच पावसामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच याच भागात विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर असल्याने आषाढी एकादशी पूर्वी महापालिकेने तातडीने परिसर स्वच्छ करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांनी महापालिकेकडे केली आहे.
कस्पटे वस्ती मुख्य रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून रखडले आहे. महापालिकेकडून कामाला दिरंगाई होत असताना या कामात निघालेला कचरा, राडारोडा रस्त्याच्या बाजूला आजही पडून आहे. दोन महिन्यानंतर शाळा पुन्हा चालु झाल्या आहेत. परंतु शाळेच्या गेट व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. साचलेला कचरा न उचल्यामुळे पहिल्याच पावसामुळे भिजून त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना जाणवत असून तातडीने अंमलबजावणी केली नाही तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. तसेच शाळेच्या बाजूला विठ्ठल रुक्मीणी मंदिर आहे. गुरुवारी २९ तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे भाविकाची मंदिरात गर्दी होत असते. अशा वेळी परीसर स्वच्छ राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आषाढी एकादशीपूर्वी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून महापालिकेने तातडीने परिसर स्वच्छ करण्याची मागणी गणेश कस्पटे यांनी केली आहे.




