लोणावळा : लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पावसाळ्यात वर्षा विहारसाठी येणाऱ्या पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. भूशी धरण ओसंडून वाहू लागल्याने शनिवार आणि रविवारी विक इंडसाठी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
मागील काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण पाच दिवसात ओव्हरफ्लो झाले आहे. स्थानिक युवकांनी शुक्रवारी रात्री धरण ओव्हर फ्लो होण्याच्या बेतात असताना धरणाच्या सांडव्यावरील मोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात लोणावळा शहरात एकूण 248 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील वर्षी 6 जुलै रोजी भुशी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. त्यामानाने यंदा धरण लवकरच 30 जून रोजी ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून फेसळत वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी मागील दोन्ही विकेंडला पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र या विकेंडला येणाऱ्या पर्यटकांना तो आनंद घेता येणार असल्याने या शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.




