पिंपरी : चऱ्होलीतून वाघोलीला जाण्यासाठी सध्या तीन मार्ग आहेत. त्याद्वारे दोन्ही गावांतील किमान अंतर १६.५ आणि कमाल अंतर २७ किलोमीटर आहे. त्यामुळे वेळ व पैसा अधिक लागत आहे. आता पुणे महापालिकेने हाती घेतलेल्या नवीन रस्त्यामुळे दोन्ही गावे अवघी ५.७ किलोमीटरवर येणार असून, रहदारीही सुसाट होईल. हा रस्ता आठ पदरी नियोजित असून कामाचे आदेश दिले आहेत.
खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) रस्ता उभारणीसाठी कंत्राटदार कंपनीला तीन वर्षांची मुदत दिली आहे. या रस्त्यामुळे चऱ्होलीसह आळंदी, देहू, भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, चाकण ही गावे वाघोलीच्या अर्थात नगर रस्त्याच्या अगदी जवळ येणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे.




