पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पाच महिन्यांपूर्वी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यावर वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. त्यामुळे इच्छुकांसह पदाधिकारीदेखील संभ्रमात असून नियुक्त्या लांबणीवर का पडल्या आहेत, या बाबत निश्चित माहिती मिळत नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीने नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मुख्य पक्ष कार्यकारिणीची निवड होणार आहे. नुकतेच पिंपरीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आदीसह विविध पदांवर काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखत घेतलेल्यांचा अहवाल राज्य कार्यकारिणीतील वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. त्यानंतर ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी अहवाल ठेवण्यात येईल. त्या नंतर ही नियुक्ती होईल, अशी अपेक्षा आहे.
शहर कार्यकारिणीकरिता इच्छुक असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत, राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तत्पुर्वीच शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने निवड न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात मरगळ आली होती. दरम्यानच्या काळात पिंपरीतील चौकात वडार समाजाचा मेळावा आयोजित करून वंचित बहुजन आघाडीने ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.




