पुणे (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या टोमॅटोच्या भावात दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ दराने शंभरीपार केल्यानंतर सद्यस्थितीत चांगल्या दर्जाच्या टोमॅटोचा भाव दीडशे रुपयांवर पोहोचला आहे. प्रतवारीनुसार किरकोळ बाजारात शंभर ते दीडशे रुपयांदरम्यान भाव आहे.
गेल्या महिन्यापर्यंत टोमॅटोची मोठी आवक झाल्याने भाव पडले होते. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. लागवड खर्च, वाहतूक खर्चही भरून न मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले होते. मात्र, त्यानंतर टोमॅटोची आवक घटल्याने भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मार्केट यार्डात रविवारी (दि. ९ जुलै) टोमॅटोची सात हजार पेटींची आवक झाली.
घाऊक बाजारात एका किलोसाठी ६० ते ६५ रुपये दर होता, तर किरकोळ बाजारात रविवारी शंभर रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत दर मिळाला. यामुळे डाळ, भाजीसह कोशिंबीरीतूनही टोमॅटो गायब झाला आहे. साधारणत: महिन्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोसाठी प्रतवारीनुसार सहा ते १४ रुपये दर होता. हाच दर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांवर होता. जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून दरवाढीला सुरुवात झाली. मध्यवर्ती भागातही चांगल्या दर्जाच्या टोमॅटोसाठी दीडशे रुपये दर आहे. आकाराने लहान आणि जास्त पिकलेल्या टोमॅटोसाठी ऐंशी ते सव्वाशे रुपये किलो दर आहे..




