पिंपरी – शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी काल रविवारी (ता. १६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कलाटे यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात मुख्यमंत्री व खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा करुन लवकरच शहरात मेळावा घेण्यात येणार आहे.
चिंचवड विधानसभा २०१९ च्या निवडणुकीतही उध्दव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली नव्हती. २०२३ च्या पोटनिवडणुकीत कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी लढविली होती. त्यांना सुरुवातीस महाआघाडीची उमेदवारी दिली जाणार होती. परंतु; ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली गेली. परंतु; कलाटे यांच्यामुळे तिरंगी लढत झाली. कलाटे पराभवानंतर शांतच होते. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आमंत्रण होते. परंतु; त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले.
कलाटे यांच्या भेटीवेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सामंत व कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कलाटे यांच्या समवेत माजी नगरसेवक नवनाथ जगताप, संपत पवार, अश्विनी वाघमारे यांनीही शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले.



