मोशी येथील क्रिकेट स्टेडिअमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखाशीर्षात बदल केला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी अंमलबजावणी केली असून, स्थायी समिती सभेमध्ये संबंधित प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘औद्योगिक नगरी’, ‘कामगारनगरी ’ अशी आहे. भविष्यकाळात ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून शहराचा लौकीक व्हावा. या हेतूने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसेच, 2019 पासून मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारण्यात येत आहे. प्रशासनाने स्टेडिअमच्या कामासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च आणि लेखाशिर्षाला मंजुरी दिली आहे.
बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलाच्या धर्तीवर ‘‘आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूल’’ विकसित करण्यासाठी व्यापक लेखाशिर्षामध्ये बदल करावा. ज्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली होती. आता नगरसचिव विभागाच्या मान्यतेने बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती मिळणार आहे.
मोशी आरक्षण क्रमांक 1/204 येथे क्रिकेट स्टेडियमसह बहुउद्देशीय क्रीडा संकुल निर्मिती झाल्यास महसुलातही भर पडणार आहे. त्यामुळे लेखाशीर्ष व्यापक करून क्रिकेट स्टेडियम आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुल विकसित करावे, अशी सूचना केली होती त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार लांडगे म्हणाले.




