पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने बड्या थकबाकी असलेल्या दोन हजार पेक्षा जास्त मालमत्ता सील केल्या आहेत. या मालमत्ता पैकी एक रूपयांचा देखील कर न भरलेल्या मालमत्तांचा टप्या-टप्याने लिलाव करण्याचे कामकाज महापालिकेने हाती घेतले आहे.
या दोन हजार जप्त केलेल्या मालमत्ता धारकांना कर भरण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. मात्र, ज्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नाही, अशा मालमत्ता टप्या-टप्याने विक्री करण्याचे नाईलाजाने निर्णय महापालिकेने घेतला आहे.
जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री कशा पद्धतीने करावी, यासाठी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने आज बुधवारी संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहात कर संकलन विभागाचे मंडलाधिकारी, गट लिपिक यांना प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण कर संकलन विभागाचे सल्लागार अनिल लाड यांनी दिले. यावेळी कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, प्रशासन अधिकारी राजाराम सरगर, नाना मोरे, कार्यालय अधीक्षक विरणक यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जप्त केलेल्या मालमत्तांची अशा पध्दतीने लिलाव करावा, या लिलावाची सविस्तर कार्यपध्दती गतवर्षी स्थायी समितीने ठरवून दिलेली आहे. लिलाव करताना कशा प्रकारच्या अडचणी येतात, जाहिरात करताना मालमत्तांचे मुल्यांकन कसे करावे, 21 दिवसांची जाहिरात कशी द्यावी, मालमत्ता धारकांला बचावाची संधी देणे, त्याचबरोबर नैसर्गिक (PCMC) न्याय तत्त्वाचा वापर करणे, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.




