चिखली,मोशी जाधववाडी शिवरोड येथील पदपथावर संवर्धन केलेली पालिकेची झाडे गुरुवारी मध्यरात्री (दि.२६) रात्री कुणी अज्ञात व्यक्तींनी तोडली आहेत. ही सर्व झाडे मागील चार वर्षात मनपाच्या सहकार्याने येथील दुकानदारांनी काळजीपूर्वक वाढवली होती.चांगली वाढलेली येथील प्रशस्त अर्बन स्ट्रीट व परिसराचे सौंदर्य वाढवणारी ही झाडे तोडल्याचे सकाळी लक्षात आल्यावर येथील जागरूक नागरिक,दुकानदार यांनी मनपाच्या उद्यान विभागाला कळवले. चांगली वाढलेली एकूण ८ झाडे सहा फुटावर तोडून त्याची रातोरात विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी तातडीने शिवरोड येथील तोडलेल्या झाडांचे पंचनामे सुरू केले आहेत. याठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असे घोडके यांनी सांगितले.




