पिंपरी – औद्योगिकनगरीची स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराची लोकसंख्या चारही बाजूने वाढत आहे. सद्यस्थितीत शहराची 27 लाख लोकसंख्या असताना वाहनांची संख्या तब्बल 23 लाख 92 हजार 521 झाली असल्याने एक विदारक वास्तव समोर आले आहे. मागील तीन वर्षांत 3 लाख 64 वाहनांची भर पडल्याने वाहनांचा दिवसेंदिवस वाढता आलेख दिसून येत आहे.
करोना काळात कमी झालेली वाहन नोंदणी पुन्हा पूर्ववत होत असून पेट्रोल, डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या 67 टक्के असून ई- वाहनांची संख्या 7 टक्के आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वर्षांन वर्ष वाढताना दिसून येत आहे. शहरात प्रामुख्याने कार, दुचाकी, रिक्षा, व्यावसायिक वाहने, बस या वाहनांची संख्या लक्षणीय आहे.
सातत्याने वाहनाची संख्या वाढत असतानाच प्रदुषणाचा आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचीही समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. वाहनांसाठी रस्ते अपुरे पडतात की काय? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. तर वाढत जाणाऱ्या वाहन संख्येचा शहराच्या रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम होऊन वाहतूक कोडीं सारख्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते असा निष्कर्ष महापालिकेच्या 2022-23 च्या पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे.
वर्ष
वाहनांची झालेली नोंदणी
२०२०-२१
९६ हजार ८४२
२०२१-२२
१ लाख ७ हजार १२०
२०२२-२३
१ लाख ६० हजार २७४
शहरात 27 हजार 969 ई-वाहने
वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका ई-वाहने वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात ई वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यानुसार ई- वाहनांची नोंदणी 2000-2020 मध्ये 1 हजार 935, 2020-21 मध्ये 1 हजार 419 तर 2021-22 मध्ये 6 हजार 873, 2022 2023 मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 17 हजार 750 ई वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे शहरात सध्या 27 हजार 969 ई वाहने आहेत.




