रस्त्यात असलेल्या दुचाकीला पीएमपीएमएल चालकाने (Wakad) हॉर्न वाजवला. त्यावरून दोघेजण चालकाला शिवीगाळ करीत होते. त्यामुळे बसचे वाहक खाली उतरत असताना शिवीगाळ करणाऱ्या दोघांनी वाहकाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री दहा वाजताच्या सुमारास वाकड येथे सूर्या हॉस्पिटल समोर घडली.
नौमान उस्मान अली (वय 24), सुलेमान उस्मान अली (वय 23, दोघे रा. भुजबळ वस्ती, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बस वाहक शिवाजी कानिफनाथ खिलारी (वय 34, रा. कुसगाव, ता. मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपीएमएलमध्ये वाहक म्हणून काम करतात. ते चिंचवडगाव ते कात्रज ही बस घेऊन जात असताना सूर्या हॉस्पिटल समोर वाकड येथे आरोपी नौमान हा दुचाकी रस्त्यात थांबवून बसला होता.
त्यामुळे बस चालकाने हॉर्न वाजवला. त्यावरून नौमान याने सुलेमान याला बोलावून घेतले. दोघांनी बस चालकासोबत वाद घातला. त्यामुळे त्या दोघांना समजवण्यासाठी फिर्यादी बसमधून खाली उतरत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.




