पिंपरी ; मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड करांसाठी पुढील एक वर्षासाठी पाण्याची चिंता मिटणार आहेत. पुणे शहरात दररोज पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. जून महिन्याच्या अखेर पर्यंत पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
१ जूनपासून धरण परिसरात ७१.९२ पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. आज २ ऑगस्टपर्यंत पवना धरणातील पाणीसाठा ८९.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील १२ महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, आता शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे.




