खालापूर : बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.याशिवाय मराठी कलाविश्वामध्ये देखील खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. देसाई यांनी त्यांच्या कर्जत- चौकफाटा येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आज सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.
कर्जत-चौकफाटा येथे नितीन देसाई यांच्या मालकीचे एनडी स्टुडिओ आहे. याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप उघड झालेले नाही; मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्या एनडी स्टुडियोवर जप्तीची टांगती तलवार होती. अशी शक्यता वर्तवली जाक आहे. मुंबईतील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. हे प्रकरण रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन महिने प्रलंबित होते.




