
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने पिंपरी येथील महापालिका भवन आणि संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वाससीएम) रुग्णालय या दोन ठिकाणी वाय फाय सुविधा नुकतीच सुरू केली आहे. इतर कार्यालयातही ती सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या सेवेचा मोफत लाभ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच, त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना घेता येणार आहे, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.
वाय फाय सेवा घेण्यासाठी प्रथम आपल्या मोबाईलमधील सेटींगमध्ये जाऊन वाय फाय सुविधा इनबिल्ड करावी. त्यानंतर अॅव्हलेबल नेटवर्कमध्ये पीसीएमसी स्मार्ट सिटी या ऑपरेशनवर क्लिक करावे. मोबाईल स्क्रीनमधील पीसीएमसी ऑफीसर / स्टाफ युजर्स या ऑप्शनवर क्लिक करावे. पीसीएमसी स्टाफ युजर्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नवीन स्क्रीन उपलब्ध होईल. त्या स्क्रीनमध्ये एम्प्लाई आयडी या रकान्यात कर्मचारी क्रमांक नमूद करून, पासवर्ड हा सेवानिवृत्तीचा दिनांक टाकावा. त्यानंतर अॅस्पेट द टर्म अॅण्ड कंडीशन येथील चेक बॉक्सवर क्लिक करावे. स्क्रीनवर माहिती समाविष्ट केल्यानंतर मोबाईलवर माहिती दिसेल. त्यानंतर मोबाईलवर वाय फाय सुविधा सुरू होईल.
महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यांनी मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. वाय फाय सुविधा सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यास एल अँड टी कंपनीचे फिल्ड इंजिनिअर यांच्याशी ९५५२३९२१३०, ९५०३१८६८१९ व ७३७२०३६०५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्मार्ट सिटीचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले आहे.
शहरामध्ये २१५ ठिकाणी वाय फाय लावण्यात आले आहे. यापैकी ८७ ठिकाणी वाय-फाय सुरु आहे. ७६० एक्सेस पॉईंटपैकी ३५७ पॉईंट सध्या लाईव्ह केले आहेत. नागरिकांच्या मोबाईलद्वारे वाय-फाय सुविधा सुरु होईल, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.




