पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार जयदेव गायकवाड हे उपस्थित होते. अडीच ते पावणेतीन तास चाललेल्या बैठकीमध्ये पक्षाची दिशा ठरवण्याबाबत चर्चा झाली अशी माहिती पिंपरी- चिंचवड शहर कार्यकारी समितीचे सदस्य सुनील गव्हाणे यांनी दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. अद्याप राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष निवडलेला नाही. शहराध्यक्ष विना बैठक पार पडल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. काही आमदार घेऊन अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. तर, काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचं आजही बघायला मिळतं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार की अजित पवार असा संभ्रम निर्माण झालेला असताना पिंपरी- चिंचवडमध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील आजी- माजी नगरसेवकांनी अजित पवारांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. तर पक्ष संघटनेतील बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली.
एका बाजूला अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्षांची नव्याने निवड केली. दुसरीकडे जयंत पाटील यांनी पिंपरी- चिंचवड शहरात कार्यकारी समिती जाहीर केली. सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर यांच्यावर शहरात कार्य पुढे सुरु ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची वाटचाल, आगामी उपक्रम, संघटनेच्या विविध निवडी, महापालिकेचे कामकाज आणि शहरातील प्रश्न यावरील पक्ष संघटनेची भुमिका इ. बाबतीत या बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच पिंपरी- चिंचवड शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे भव्य उद्घाटन होणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले.




