पुणे : एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शहरातील नागरिकांचा मेट्रोचा प्रवास सुसाट झाला आहे. विस्तारित मेट्रो मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला असून या मेट्रोमार्गांना नागरिकांच्या माध्यमातून विशेष पसंती दाखवली जात आहे.
आता शहरातील मेट्रो सकाळी सात वाजेपासून सुरू होत आहे मात्र ही मेट्रो सकाळी सहा पासून सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे ही मागणी केली होती. या मागणीवर सकारात्मकता दाखवली असून यासंबंधीत मेट्रोकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेट्रोच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता शासनाच्या माध्यमातून आदेश निर्गमित झाल्यानंतर पुणे मेट्रो सकाळी सहा वाजेपासूनच प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे.
पुण्यातून मुंबईला दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. पुण्यातील प्रवासी पुणे स्टेशन येथून डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेसने मुंबईचा प्रवास करतात. पण डेक्कन क्वीन सकाळी सात वाजता सुटते, म्हणजे ज्यावेळी मेट्रो सुरु होते त्याचवेळी डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना होऊन जाते.
तर प्रगती एक्सप्रेस 7 वाजून 50 मिनिटांनी निघते. अशा परिस्थितीत मेट्रो सेवा सातला सुरू होत असल्याने डेक्कन क्वीनच्या वेळेशी ताळमेळ जुळत नाही. म्हणजेच सकाळी मुंबईचा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मेट्रोचा फायदा होत नाही. अशा परिस्थितीत हा ताळमेळ जुळवण्यासाठी पुण्यातील मेट्रो सकाळी सहा वाजेपासूनच सुरू व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आता शासनाकडून आदेश निर्गमित झाल्यानंतर पुणे मेट्रो सकाळी सहा वाजेपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे




