चाकण : खासदार झालं की काहींना मोठं झाल्यासारखं वाटतं अन् शूटिंगला निघून जातात, अशी बोचरी टीका शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर केली होती. त्याला खासदार कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. पाटलांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी टीकास्र सोडलं.
यावर खासदार अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर अशा प्रकारची टीका म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे. त्यांना लोकांची दिशाभूल करायची सवय असून कदाचित वयामुळे विस्मरण झालं असेल. आपल्याला पहिल्याच टर्ममध्ये दोन वेळा संसदरत्न मिळाला आहे. देशातले जेवढे पहिल्या टर्मचे खासदार आहेत त्यात शिरुरला तिसरा क्रमांक मिळाला आहे. असे कोल्हे पुढे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीची संसदेतली उपस्थिती, चर्चांमधली प्रश्नोतरे त्यामुळे संसदरत्न मिळण्याचा बहुमान मिळाला. मायबाप मतदारांनी मला संधी दिली आहे.




