पिंपरी, दि. २५ ऑगस्ट :- रहाटणीत छ. शिवाजी महाराज यांच्या २१ फुटी अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण झाले आहे. मात्र या परिसरात समाजकंटक तसेच मद्यपी राडारोडा व कचरा टाकत आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या संरक्षणासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या ठिकाणी प्रत्येक रविवारी ग्रामस्थ, सर्व शिवभक्त, बजरंग दल, यांच्या वतीने शिववंदना घेतली जाते. दरम्यान मेघडंबरी व शिवसृष्टी परीसरात अनेक दिवसांपासून समाजकंटक तसेच मद्यपी राडारोडा व कचरा टाकत आहेत. त्यामुळे स्मारकाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. स्मारकाची विटंबना होऊन अनुचित प्रकार घडु शकतो.
परिसरात सुरक्षा ग्रिल, सुरक्षा रक्षक व सीसीटिव्ही कॅमेरे बसवुन स्मारकाचे संरक्षण करण्याची त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. येत्या पंधरा दिवसांत यावर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिला आहे.




