पिंपरी : महापालिकेतील विविध कामाबांबत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. चुकीचे काम झाल्यास कारवाई केली जाईल. काही कामांबाबत आमचे पदाधिकारी न्यायालयात गेले त्याची माहिती घेऊन तथ्य आहे की नाही याची चौकशी करणार आहे. महापालिका निधीतील रक्कम कोणत्या मतदारसंघात किती खर्च केली जात आहे याचा आढावा घेत आहे. सर्वच भागात विकासकामे झाली पाहिजेत. केवळ भोसरीतच विकासकामे होत असतील तर चुकीचे आहे. आता मी पुन्हा सरकारमध्ये आलो आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी झपाटून काम करणार आहे. निम्याच्यावर पिंपरी-चिंचवडकर झोपले असतानाच शहरात येऊन विकासकामांची पाहणी करणार आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प गुंडाळला जाणार नाही. न्यायालयाने नेमलेल्या समितीने आठ महिने बंद पाईपलाईन आणि चार महिने नदीतून पाणी उचलावे, असा पर्याय दिला आहे. परंतु, या कामाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठविण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त पुढील कारवाई करतील, असेही ते म्हणाले.
अविष्कार नगरी (सायन्स सिटी) या प्रकल्पासाठी ३५ एकर जागा लागत आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकार निधी देत आहेत. शहरात एवढी जागा नाही. मुंढव्याला मोठी जागा मिळाली आहे. कमी जागेत मदत करण्यास केंद्र सरकार तयार नाही. जिथे जागा उपलब्ध होईल, तिथे हा प्रकल्प उभारला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.




