पिंपरी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष २०१९ मध्ये शिवसेनेसोबत जातील, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, तीनही पक्ष एकत्र आले. कोरोना काळात मी मंत्रालयात बसून काम करत होतो. त्यानंतर सत्ताबदल झाला. पुन्हा राजकीय स्थित्यंतरे घडली. आम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींना वेगळे वाटले, पण हरकत नाही. आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहोत. मी सत्तेसाठी भाजपबरोबर गेलो नाही. राज्याचा, शहरांचा विकास करण्यासाठी, कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. भाजपबरोबर सत्तेत गेलो असलो, तरी आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार सोडला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्त्यांचे मिळत बोलताना मत व्यक्त केले.
सर्वधर्मसमभाव ही आमची भूमिका असून, आम्ही विचारधारा सोडली नसल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. ‘कोण काय म्हणतेय याबाबत मला काही बोलायचे नाही. आम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींना वेगळे वाटले. पण, हरकत नाही. शरद पवार यांच्या विधानाकडे मी उलट्या अर्थाने बघतो,’ असे सूचक विधानही उपमुख्यंमत्री पवार यांनी केले. शरद पवार यांनी अजित पवार हे पक्षाचे नेते असल्याचे वक्तव्य केले आणि नंतर त्यावर घूमजावही केले. त्यावर पिंपरीत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सुरुवातीला शरद पवार यांच्या विधानावर ‘नो कॉमेंट्स’ असे म्हटले. मात्र, लगेचच ‘मी या विधानाकडे उलट्या अर्थाने पाहतो’ अशी टिप्पणी केली.




