पिंपरी (प्रतिनिधी)- श्रावण महिना सुरू झाला की, व्रतवैकल्य, सणांना प्रारंभ होतो. त्यामुळे घरोघरी तसेच बाजारातही नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण असते. सणांसाठी घर, आंगणाच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारात रेलचेल असते. मात्र, थर्माकोलला बंदी घातल्यानंतर घातक प्लॅस्टिकच्या फुले, पाने, वेली आणि सजावटीच्या साहित्याचा वापर होत असून या साहित्यांनी बाजार बहरला आहे.
गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी या सणांसाठी प्रामुख्याने सजावट केली जाते. या सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या सजावटीच्या साहित्याचा वापर करण्यात येत आहे. या साहित्याची शहरासह उपनगरांमधील बाजारपेठेत सर्रास विक्री सुरू आहे. उत्सवातील थर्माकोल बंदीमुळे हद्दपार झाला असला, तरी त्याची जागा घेतलेल्या निकृष्ट दर्जाच्या प्लॅस्टिक सजावटीच्या साहित्याचा वापर मात्र सुरू झाला आहे.
प्लॅस्टिकबंदीच्या नवीन नियमांनुसार या साहित्यावर बंदी असल्याचेही विक्रेत्यांना माहितीच नाही. प्लॅस्टिकबंदीच्या जुन्या नियमावलीत या साहित्याचा उल्लेख नाही. त्यामुळे कोणताही कारवाई होताना दिसत नाही. अविघटनशील प्लॅस्टिक पर्यावरणास घातक आहे. कृत्रिम फुलांसाठी प्रामुख्याने पॉलिथिनचा वापर केला जातो. तसेच या फुलांची जाडी ही साधारणतः २९ ते ३० मायक्रॉन आहे. त्यामुळे ही फुले व वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे साहित्य पर्यावरणास घातक आहे. मात्र, त्याकडे विक्रेते, महापालिका प्रशासन आणि नागरिकांचेही दुर्लक्ष होत आहे. अशा घातक फुलांचा वापर प्राधान्याने टाळणे आवश्यक असून त्यातून पर्यावरण रक्षणास हातभार लागेल.



