पिंपरी (प्रतिनिधी)- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे कन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो २०२४ ( प्रदर्शन ) भरविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. बांधकाम उद्योगातील अद्ययावत यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रदर्शन बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फाउंडेशन आणि संकल्प भागीदार (कन्सेप्ट पार्टनर ) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे प्रदर्शन ४ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे भरविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सहयोगी भागीदार म्हणून सहकार्य करत आहे. ३० हजार चौरस मीटर जागेवर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. बांधकाम उद्योगातील अद्ययावत यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
याप्रसंगी व्हर्च्यूअल कॉन्स्ट्रो प्रदर्शनाचीही घोषणा केली आहे. कॉन्स्ट्रो २०२४ प्रदर्शन ४ जानेवारी २०२४ पासून मोशी येथे होणार आहे. यावेळी बैठकीत पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष विश्वास लोकरे, कॉन्स्ट्रो २०२४ चे अध्यक्ष जयंत इनामदार, शिरीष केंभवी, मनोज देशमुख, पीएमआरडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी, स्नेहल बर्गे, सुनिल पांढरे महानगर आयुक्तांचे ओएसडी रामदास जगताप, उपायुक्त मनिषा कुंभार, प्रविण ठाकरे, तहसिलदार अभिजीत जगताप, अधिक्षक अभियंता बागडी व उप अभियंता पाटील आदी उपस्थित होते.
प्रात्यक्षिके आणि बरच काही
आर्किटेक्चर, स्थापत्य अभियांत्रिकी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना नवीन विकासकामे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीनतम बांधकाम उपकरणे व साहित्य समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल कॉन्स्ट्रो प्रदर्शनासोबत बांधकाम उद्योगाशी संबंधित विषयांवर चर्चासत्र होणार आहे त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील नामवंत तज्ञ व प्रख्यात वास्तुविशारद विचार मांडणार आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी प्रात्यक्षिक क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, सुरक्षा प्रात्यक्षिकही घेण्याचा निर्णय पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी घेतला. या प्रदर्शनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सहयोगी भागीदार म्हणून सहकार्य करणार आहे.




