पिंपरी : भक्ती शक्ती शिल्पसमूह शिल्पाजवळील जागा सार्वजनिक उपक्रमांना न देता पेठ क्र. २१ जागा क्र. ९ निगडी सर्वे नं. ८३ मधील एक एकराची पर्याय जागा सार्वजनिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने जाहीर केला आहे. त्याला भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती व सर्व पक्षीय संघटनांकडून विरोध करून पीएमआरडीए प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
ही जागा भक्ती-शक्ती शिल्पसमूह व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून दूर अडगळीत लोकवस्तीत जागा असून ज्या उदात्त उद्देशासाठी ही जागा देऊ केली आहे. तो उद्देश यशस्वी होऊच शकणार नाही. आम्ही मागणी करीत असलेल्या भूखंडाबाबत संबंधितांना वेळोवेळी कळवले. हे जे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे, ते सपशेल खोटे असून, अशी आमची महिवाल यांच्याशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे महिवाल यांचा हा निर्णय पिंपरी-चिंचवडकरांची फसवणूक करणार आहे.
महिवाल यांनी वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर न मांडता केवळ बिल्डरधार्जिनी मांडणी करून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून हा निर्णय मनमानी पद्धतीने घेतलेला आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत, असे भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती व सर्व पक्षीय, संघटनांकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


