भोपाळ (पीटीआय) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज राज्यातील महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये ‘लाडली बहना’ या योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या एक हजार रुपयांच्या रकमेत वाढ करत ती १,२५० रुपये केली आहे. तसेच, महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३० ऐवजी ३५ टक्के आरक्षण देण्याचेही जाहीर केले आहे.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर महिलांवर मदतीचा वर्षाव सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले, “श्रावण महिन्यामध्ये महिलांना ४५० रुपयांमध्ये स्वयंपाकाचा सिलिंडर पुरविला जाणार आहे. नंतर यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा तयार केली जाईल.
राखी पौर्णिमाही दोन दिवसांवर आली असल्याने राज्यातील १.२५ कोटी महिलांच्या खात्यांमध्ये मी २५० रुपये जमा केले आहेत. शिक्षक भरतीतील महिलांसाठीचे आरक्षण ५० टक्के असेल.” याशिवाय, औद्योगिक क्षेत्रात महिलांना जमीन, अतिक्रमणातून मुक्त केलेली जमिनीचे महिलांना वाटप अशा योजनाही मुख्यमंत्री चौहान यांनी जाहीर केल्या. महिलांचे सरासरी मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांपर्यंत नेण्याचे सरकारचे उदिष्ट असल्याचे चौहान यांनी सांगितले.
काँग्रेसची टीका
मध्य प्रदेशात भाजपविरोधी वातावरण असल्याने आपले ‘बुडते जहाज’ वाचविण्यासाठीच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या योजना जाहीर केल्या असल्याची टीका कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केली आहे




