पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत माध्यमिक, प्राथमिक आणि खासगी शाळेतील १६ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच यंदा शाळा आणि शिक्षकांना ८ विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण आज शिक्षक दिनी चिंचवडमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ वाजता हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आदर्श शिक्षकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, एक रोप देण्यात येणार आहे.
शिक्षण विभागामार्फत पालिकेच्या आणि खासगी शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यासाठी शिक्षकांचे आणि शाळांचे प्रस्ताव मागविले होते. यासाठी १०० गण निश्चित करण्यात आले होते. आलेल्या १४५ प्रस्तावाची १० जणांची तज्ञ समितीने छाननी करून गुण दिले. सर्वात जास्त गुण मिळालेल्या प्राथमिक विभागाच्या ८, माध्यमिक ३, बालवाडी ३ तर दोन खासगी शाळेतील शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यासह शाळा आणि शिक्षकांना ८ विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.




