पिंपरी : ऑगस्टच्या तुलनेत या महिन्यात नागरिकांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण घटले आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. या उलट गेल्या महिन्यात हे प्रमाण पाच हजारांच्या आसपास होते. यामुळे डोळे येण्याची साथ आटोक्यात आली असल्याचे सकारात्मक चित्र शहरात दिसत आहे. सध्या शहरात ९१२ सक्रीय रुग्ण आहेत.
जुलैमध्ये आळंदी येथून सुरू झालेल्या डोळे येण्याच्या साथीचा ऑगस्टमध्ये शहरात वेगाने प्रसार झाला. याचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये अधिक असल्याने याचा संसर्ग शाळांत जास्त प्रमाणात झाला होता. त्याचा अटकाव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी शाळांमध्येही तपासणी केली जात होती. मात्र, लहान मुलांमध्ये असणाऱ्या संसर्गाचा प्रसार मोठ्यांमध्येही झाल्याने ऑगस्टमध्ये डोळे आलेल्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. परंतु, गेल्या महिन्याच्या तुलनेने या महिन्यात डोळे येण्याच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. डोळे आलेले रुग्ण बरे होण्याची संख्याही अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे ही साथ आटोक्यात आल्याची चिन्ह असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.




