लखनौ (पीटीआय) : देशातील सात महत्त्वाच्या राज्यांत सहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी आज रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाली. आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीची ‘इंडिया’ आघाडीची ही लिटमस टेस्ट मानली जाते. लवकरच पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार असून त्यानंतर पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे.. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगालमध्ये उच्चांकी मतदानाची नोंद झाली तर उत्तरप्रदेश उत्तराखंडमध्ये मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. त्रिपुरातील धानपूर आणि बॉक्सनगर येथे ७६ टक्के मतदानाची नोंद झाली, येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. दरम्यान येथे मतदानादरम्यान झालेल्या किरकोळ हिंसाचारामध्ये सहा लोक जखमी झाले.
पश्चिम बंगालमधील धुपगुडी आणि केरळ येथील पुथूप्पल्ली येथे अनुक्रमे ७६ आणि ७३ टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तरप्रदेशातील घोसी मतदारसंघामध्ये ५०.३० टक्के, झारखंडमधील डुमरी येथे ६४.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तराखंडमधील बागेश्वर येथे ५५.४४ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे.




