पिंपरी (प्रतिनिधी) : एक देश एक निवडणूक, राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पालिका निवडणूक होईल अशा कल्पनेतून दरवर्षी दहीहंडीसाठी शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये मराठी-हिंदी अभिनेते आणि अभिनेत्रांना आमंत्रित करून अनेक राजकीय पक्षातील नेत्याकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव भरविला जातो. या सिनेतारकांमुळे दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु यावर्षी दरवर्षीप्रमाणे राजकीय नेत्याकडून उत्साह कमी जाणवत असल्यामुळे सोशल मीडियावरील जाहिरातबाजी यंदा दिसत नाही. चौका-चौकात लागणारे भव्य होर्डिंग, फ्लेक्सबाजी कमी जाणवत आहे.
निवडणुकीचा अद्याप पत्ता नसल्याने राजकीय मंडळींना हात आखडता घेतला आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सेलिब्रिटींना आमंत्रित करणाऱ्या मंडळांची संख्या कमी आहे. तसेच दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भरीव आर्थिक सहाय्य करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक नेहमीच आघाडीवर असतात. मात्र महापालिका निवडणुकीचा चिन्ह दिसत नसलेले राजकीय लोकांनी आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवले आहेत.
१३ मार्च २०२२ रोजी महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. गेल्या दीड वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. इच्छुक पालिकेची निवडणूक कधी होणार? याकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून विविध कार्यक्रम, वर्गणी देऊन इच्छुकांचा खिसा रिकामा होण्याची वेळ आल्याने दहीहंडी आणि गणेशोत्सवाला वर्गणी देण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे.




