किवळे – पारंपरिक सण उत्सवाची परंपरा जपली जावी नव्यापिढीला त्याचे आदान प्रदान व्हावे, खेळ व गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे महिलाच्या कलागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन जागृत मित्र मंडळ, विकास नगर, किवळे येथे करण्यात आले होते.
यामध्ये विविध खेळ खेळण्याची परंपरा जतन करीत महिलांनी वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा यांसारख्या पारंपरिक खेळांबरोबर लाट्या बाई लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं अशी प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगत गेला. मंगळागौरीचे खेळ खेळताना स्त्रिया या गाणी म्हणत सूप फिरवत नाचत फुगड्या, लाटण्याचे खेळत एकाहून एक सरस गाण्यावर नृत्य करीत फुगड्या घालत एकमेकीचा उत्साह वाढवताना दिसल्या. सर्व महिलांची वेशभूषा मराठमोळी व सर्वानाच भावणारी होती. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाल्या होत्या. नुकताच आलेला चित्रपट ‘बाईपण देग देवा’ याचं लूक तसेच या चित्रपटाची क्रेज सर्व महिलांमध्ये दिसत होती.
या जगात धावपळीच्या युगात परंपरा कमी झाल्या आहेत. दैनंदिन कामकाजातून महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे म्हणून मंगळागौर, भोंडला असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम साजरे करीत मंडळातील महिला एकत्र येऊन आपले सुखदुःख एकमेकींसोबत वाटत परंपरा महिलानी जपली आहे असे येथील महिलांनी सांगितले. तसेच स्वत:ची आवड जोपासता यावी. मंगळागौर सणाचे विशेष महत्व सर्वाना कळावे यासाठी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
या महिलांनी केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भर भरून दाद दिली. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक जीवन आनंदी व्हावे यासाठी सर्वानी प्रार्थना केली व कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.




