पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवडमधील पेठ क्रमांक १२ येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या ७५० सदनिका वाटपाविना पडून आहेत. अल्प उत्पन्न घटकातील लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वाटप प्रक्रिया रखडली. त्यामुळे या घटकासाठी बांधण्यात आलेल्या १ हजार ५६६ सदनिकांपैकी केवळ ८१६ सदनिकांचे वाटप झाले आहे. उर्वरीत सदनिकांचे वाटप कधी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पीएमआरडीएने पेठ क्रमांक १२ मधील गृह प्रकल्पात ४ हजार ८८३ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या २ बीएचके सदनिका बांधल्या आहेत. त्यातील १ हजार ५६६ सदनिकांपैकी ८१६ सदनिकांचे वितरण झाले आहे. उर्वरित सुमारे ७५० सदनिका पडून आहेत. त्याचे वाटप पीएमआरडीएकडून अद्याप हाती घेण्यात आले नाही. या घरांच्या वाटपासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमआरडीएचे सहआयुक्त बन्सी गवळी यांनी दिली.
पेठ क्रमांक १२ मधील वन बीएचके सदनिका या तुलनेत खूप स्वस्त मिळत आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या सदनिकांची किंमत ९ लाख ९० हजार इतकी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत या सदनिकांचा समावेश असल्याने अडीच लाख रुपयांची त्यावर सबसिडी मिळते. म्हणजे येथील एक सदनिका ७ लाख ४० हजार रुपये इतक्या किमतीत उपलब्ध होत आहे. या सदनिकांसाठी जाहीर केलेल्या निवड यादीनंतर कागदपत्रांचा अभाव, स्वहिस्सा रक्कम न भरणे अशा विविध कारणांमुळे अपात्र ठरलेल्या सोडत विजेत्यांऐवजी आता शिल्लक सदनिकांसाठी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जात आहे.
उत्पन्न मर्यादेचा अडसर
अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाखांपेक्षा कमी आहे. तरी पेठ क्रमांक १२ येथील अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या सदनिकेची किंमत ९ लाख ९० हजार इतकी आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ ते ६ लाख एवढी आहे. या उत्पन्न मर्यादेतील नागरिकांना एवढी किंमत देणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. तर, वार्षिक सहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना या घरांसाठी अर्ज करता येत नाही.
महिनाभरात अर्ज प्रक्रिया
येत्या महिनाभरात शिल्लक राहिलेल्या सर्व सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरणे व त्यापुढील सर्व कार्यवाही ऑनलाइन होणार आहे. घरासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आल्यानंतर निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर मात्र, कागदपत्र पडताळणीसाठी अर्जदारांना पीएमआरडीए कार्यालयात यावे लागणार आहे. नागरिकांनी घरांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




