पुणे – इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी २.०) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातही ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ उभारले जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पहिले मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर रांजणगावात उभारले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधी केंद्र सरकारने नुकताच सुपुर्त केला आहे.
असे असेल क्लस्टर रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर हा प्रकल्प होत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून २०७ कोटी ९८ लाख रुपये मदत उपलब्ध होणार आहे. आयएफबी, एलजी आणि गोगोरो ईव्ही स्कूटर यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. येथून डायोड, इंटिग्रेटेड सर्किट, व्हॅक्युम ट्यूब्स, बॅट्रीज, रेजिस्टर्स, कॅपॅसिटर, इंडक्टर्स, ट्रान्झिस्टर्स इ. वस्तूंचे उत्पादन अपेक्षित आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि ‘एमआयडीसी’ने पाठपुरावा केला आहे.
ठळक मुद्दे…
■ राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार रांजणगावात हा प्रकल्प होत आहे.
■ यापूर्वी देशात असे प्रकल्प नोएडा, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये आहेत.
■ तेथे विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन घेतले जाते.
■ भारतासह बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही फायदा होतो.
■ स्टार्ट अप योजनेलाही प्रोत्साहन मिळते.
४९२ कोटी ८५ लाख रु. रांजणगाव येथील प्रकल्पाची एकूण किंमत
प्रकल्पाचे फायदे
■ रोजगारनिर्मिती करण्यासह स्थानिक उत्पादकांना पाठबळ
■ ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल
■ अधिक उद्योजक, कंपन्या आकर्षित होण्याचा विश्वास



