पिंपरी (प्रतिनिधी) – शासकीय नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याच्या राज्य सरकारच्या शासन निर्णयाची छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने होळी करण्यात आली. एकीकडे मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला असताना दुसरीकडे हा निर्णय घेऊन सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.
निगडीतील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. १२) झालेल्या आंदोलनात धनाजी येळकर-पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे आदी सहभागी झाले होते. शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकारने नुकताच घेतला आहे. एकीकडे मराठा रस्त्यावर आरक्षणासाठी समाज उतरला असताना दुसरीकडे हा निर्णय घेऊन सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर, कंत्राट पद्धतीमुळे आरक्षणाला अर्थ राहणार नाही असा दिशाभूल करणारा संदेश तरुणांना अप्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सरकारचा डाव, कूटनीती आणि चुकीच्या कार्यपद्धीचाच आरसा असल्याचा आरोप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.




