पिंपरी (प्रतिनिधी) सार्वजनिक गणेशोत्सवातील मंडळाना आवश्यक परवानग्या ऑनलाइन अर्ज पक्रियेद्वारे दिल्या जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने मंडळांना ऑनलाइन मंडप परवानग्या देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिका व पोलिस आयुक्तालयाचे दोन वेगवेगळया संकेतस्थळांवर अनुक्रमे पालिका व पोलीस स्टेशनला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दोन्हीही संकेतस्थळे एकमेकांशी जोडलेली आहेत. ऑनलाइन अर्ज व परवानगीही ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन गणेशोत्सव २०२३ या लिंकवर क्लिक केल्यानंतर मंडळाने नोंदणी करावी. त्यावेळी मंडळ अध्यक्षांचा मोबाइल क्रमांक ओटोपीसाठी वापरण्यात येणार आहे. मंडळाअंतर्गत येणारे पालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व निवडणूक प्रभाग यांची नोंद केल्यानंतर संबंधित अर्ज क्षेत्रीय कार्यालयास प्राप्त होईल, पुढील प्रक्रियेसाठी तो अर्ज स्थापत्य व अतिक्रमण विभागाला पाठवण्यात येईल.
पोलिसांची अर्ज प्रक्रिया
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरून गणेश मंडळांना अर्ज करता येईल. त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे सचिव खजिनदार यांची सर्व माहिती फोटोसह अर्जामध्ये नोंद करावयाची आहे. मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर हे ओटीपी पाठवून निश्चित केले जातील. मंडळाने संबंधित पोलीस ठाणे निवडायचे आहे, जेणेकरून फॉर्म हा संबंधित पोलीस स्टेशनच्या लॉगिनला जाईल व तिथूनच त्या परिसरातील वाहतूक विभागाला तो वर्ग केला जाईल, वाहतूक विभाग अभिप्राय नोंदवून संबंधित पोलीस ठाण्याला तो अर्ज परत वर्ग करेल.




