पिंपरी (प्रतिनिधी) इंडियाचा धसका घेऊन केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे २०० रुपये कमी केले. सरकारला नेमकी कोणती साठी लागली. याचा अर्थ केंद्र सरकार गोरगरीब, कष्टकरी, मजुरांनी घाम गाळून कमवलेल्या दोनशे रुपयांची लूट करीत होते का? असा प्रश्न शिवसेना (ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी पिंपरीतील नागरिकांशी चर्चा करताना केला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी होऊ दे चर्चा कार्यक्रमांतर्गत ‘ भेटीगाठी दौरा सुरू केला आहे. पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर यांनी गुरुवारी (दि. १५) सायंकाळी पाच वाजता पिंपरी भाजी मंडई येथील विक्रेत्यांची भेट घेतली. शगुन चौकातील व्यवसायिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, शहर संघटक संतोष सौंदणकर, रोमी संधू उपस्थित होते.
संतोष सौंदणकर म्हणाले, २०१४ पर्यंत घरगुती वापरावर महावितरणकडून ४० रुपये स्थिर आकार आकारला जात होता. तर, औद्योगिक वापरासाठी १५० रुपये स्थिर आकार होता. भाजप सरकारने घरगुती स्थिर आकार १३० रुपये आणि औद्योगिक ४७२ रुपये केला. २०२३ मध्ये औद्योगिक स्थिर आकार ८००० रुपये जमा करावा लागत आहे. तसेच पूर्वी सर्व शासकीय कार्यालयात फॉर्म शुल्क आकारले जात नव्हते. आता फॉर्मच्या शुल्कासह महाईसेवा केंद्राचे शुल्क देखील भरावे लागत आहेत, ही एक प्रकारची लूटच आहे, असा आरोपही त्यांनी केला.




