पिंपरी : आमचे दैवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांनी स्वतःचे तोंड आरशात पाहून टीका करावी. पडळकर यांनी स्वतःच्या समाजासाठी काय केले, स्वतःच्या पक्षासाठी तरी काय केले. केवळ पावसाळी बेडकाप्रमाणे डराव डराव करू नये आणि वाघाचं कातड पांघरलेल्या कोल्हयाचे जशी अवस्था होती तशी आवस्था पडळकर यांची झाली आहे. त्यांनी अजितदादा वरती टीका करताना शंभर वेळा विचार करावा. अन्यथा तोंडाला काळे फासू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
काय आहे हे प्रकरण…
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह २ जुलै २०२३ रोजी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियावेळी केली आहे.
धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पण, अजित पवारांना पत्र लिहिलं नाही. याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आक्रमक झाले असून गोपीचंद पडळकर यांना भाजपने समज द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांची राज्यात नाकेबंदी करतील असा इशारा आहे देण्यात आला आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार सहभागी झाल्यानंतर भाजपमधील अनेक वाचाळवीरांना काय करावे सुचत नाही. त्यातीलच एक मंगळसूत्र चोर असणारा गोपीचंद पडळकर याने आमचे दैवत अजित पवार यांच्या सारख्या मोठ्या नेत्यावर चिखलफेक केली की भरपूर प्रसिद्धी मिळते असे वाटते. मग लोकांना व त्यांच्या पक्षातील नेत्यांना आपोआप पडळकर नावाचा कोणी तरी नेता आहे हे कळू लागतं. मोठ्या लोकांवर टीका करून आपलं अस्तित्व प्रस्थापित ठेवायचं. आपलं राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्यासाठीच पडळकर यांची केविलवाणी धडपड आहे असे अशी टीका नाना काटे यांनी केली आहे.




