पिंपरी: लोकनेते यशवंतराव चव्हाणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ‘एमआयडीसी’ निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे शहरात ‘आयटी पार्क’ आले, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगून शरद पवार यांच्यामुळेच शहराचा विकास झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.
शहरासाठी शरद पवारांनी काय केले, किती निधी आणला, किती नेते मोठे केले हेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे सांगत असताना रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख करणेही टाळले. त्यामुळे आता शहराचा विकास शरद पवारांनी केला, की अजित पवारांनी हा वाद पेटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, माधव पाटील आदी उपस्थित होते. रोहित पवार म्हणाले, ‘शरद पवार केंद्रात मंत्री असताना शहरातील विकासासाठी ‘जेएनएनआरयूएम’ अंतर्गत तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दूरदृष्टी ठेवून दिला आहे. त्यामुळेच शहरात प्रशस्त रस्ते, पूल झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपची सत्ता असताना कोणती मोठी विकासकामे झाली आहेत. ७० टक्के कामे गुजरातच्या कंपनीला दिल्याचे दिसते. कोणत्याही कंपनीला काम द्या पण कामे पूर्ण झाली पाहिजेत. तसे होताना दिसत नाही.