पिंपरी-चिंचवड महापालिकेने गाजावाजा करत आणलेले सशुल्क पार्किंग (पे अॅण्ड पार्क) धोरण काही महिन्यातच बासनात गुंडाळले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या २७ लाख असून वाहनांची संख्या 27 लाख आहे. गेल्या तीन वर्षांत तीन लाख 64 वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी सशुल्क पार्किंग (पे अॅण्ड पार्क) धोरण आणले.
पहिल्या टप्प्यात शहरातील 80 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात 20 ठिकाणीच 1 जुलै 2021 पासून ‘पे अॅण्ड पार्क’च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. वाहतूक पोलिसांना पाच टोईंग व्हॅन दिल्या. तरीही योजना बारगळली. काही महिन्यातच निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराने उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता काम आपल्याला परवडत नसल्याचे सांगत माघार घेतली. त्यामुळे धोरण (PCMC) गुंडळले. राजकीय विरोधामुळे महापालिका प्रशासनानेही धोरणाच्या अंमलबजावणीवर भर दिला नाही.