पुणे : गणेशोत्सवासाठीची महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, औषधोपचार व्यवस्था, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवरील कर्मचारी व्यवस्थापन, जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच उत्सवाच्या काळात जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांची गळती रोखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान महापालिकेच्या अंतर्गत सर्व दवाखाने आणि रुग्णालयामध्ये विनामूल्य औषधोपचार दिले जाणार आहेत.
गणेशोत्सवास आज सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, सर्व १५ क्षेत्रीय कार्यालये, अग्निशमन दल, विद्युत विभाग आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच फिरती स्वच्छतागृहेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर मिरवणूक मार्गावर स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. औषधोपचारांची व्यवस्थाही करण्यात आली असून कंटेनर, निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विसर्जन घाटांवर औषध फवारणी करण्यात आली असून नदी किनारच्या घाटांवर विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सुविधा देण्यात आली आहेत. विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा ठिकठिकाणी बसविण्यात आली आहे.
फिरते दवाखाने
आरोग्य विभागाकडून चार फिरत्या दवाखान्यांची सुविधा देण्यात आली असून ही सेवा विसर्जन मार्गावर राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये फिरत्या दवाखान्यांबरोबरच १०८ रुग्णवाहिकेची सुविधाही आहे. गणेशोत्सवाच्या कालावाधीत सर्व दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये विनामूल्य औषधोपचार आरोग्य विभागाकडून दिले जाणार आहेत.