पिंपरी : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने मोशीतील बो-हाडेवाडी येथे सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून बांगलादेशी चलन, भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त केले. सुकांथा बागची (वय २१), नयन बागची (वय २२) आणि सम्राट बाला (वय २२, तिघे मूळ रा. ग्राम बहादुरपूर, दतोकन्दवा, जिल्हा मदारीपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय महादेव दराडे यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील बो-हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. या गृहप्रकल्पावर बिहार, उत्तर प्रदेशमधील मजूर काम करतात. त्यांच्यासोबत तीन बांगलादेशीही वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत मजुरांकडे विचारणा केली असता तिघांना हिंदी भाषा येत नव्हती. चौकशी केल्यानंतर तिघे मूळ बांगलादेशी असल्याचे समोर आले.