पिंपरी (प्रतिनिधी)- दीड दिवसांच्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच विसर्जनाला सुरुवात होत आहे. यानंतर पाचव्या दिवशी शनिवारी गौराईसोबत काही गणपतींचे विसर्जन होणार आहे. या दृष्टीने महापालिकेने शहरातील सर्व विसर्जन घाटांवर जोरदार तयारी केली आहे. शहरातून वाहणाऱ्या तीनही नद्यांच्या दहाहून अधिक घाटांवर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश भक्तांसाठी घाटावर विसर्जन हौद, मूर्ती दान केंद्र व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बुधवारी (दि. २०) दिड दिवसांच्या घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला. नागरिकांची कुठेही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी येथील विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था केली आहे. पवना नदीपात्रावरील रावेत, चिंचवड, थेरगाव, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व सांगवी येथील विसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंद्रायणी नदीपात्र भील चिखली, मोशी, डुडुळगाव व चहोली आदी विसर्जन घाटांवर देखील व्यवस्था केली आहे. तसेच, मुळा नदीपात्राच्या वाकड, पिंपळे निलख येथील विसर्जन घाटांवर देखील भक्तांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहे.
विसर्जन घाटांवर घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. मूर्ती दान करु इच्छिणाऱ्या भक्तांसाठी महापालिकेने स्वतंत्र केंद्र उभारले आहेत. पुजेसाठी वापरले जाणारे निर्माल्य संकलन करण्यासाठी निर्माल्य कुंड ठेवले आहेत.
गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी. लहान गणेश मूर्तीचे कृत्रिम हौदात विसर्जन करावे. इको फ्रेंडली बाप्पांचे विसर्जन घरी स्वच्छ पाण्यात करावे. शक्यतो मूर्ती दान करण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे. निर्माल्य कुंडांचा वापर करावा. शांततेचे पालन करुन पारंपरिक पध्दतीने बाप्पांना निरोप द्यावा.
• शेखर सिंह,
आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका




