पुणे : पुण्यातील थंड हवेच्या ठिकाणापैकी लोणावळ्याला अधिक प्रसिद्ध आहे. लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. आता या पर्यटनात आणखी भर पडणार आहे. निसर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दोन हजार फूट दरीतून चालण्याचा आणि हेवतून झेपावण्याचा आनंद पर्यटकांना काही दिवसात घेता येणार आहे. कारण या ठिकाणी आता ग्लास स्काय वॉक उभारण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळ्यातील पर्यटन स्थळांचे रुपडे लवकरच पालटणार आहे. साधारण साडेतीनशे ते चारशे मीटर लांबीचा हा स्काय वॉक असणार आहे. लायन्स आणि टायगर पॉईंटचे रुपडे पालटणार आहे.
या संदर्भातला व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. हजार फूट खोल दरीवर स्काय वॉक उभारून हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे दरीतून चालण्याचा आणि हवेतून झेपावण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे. या बरोबरच लहान मुलांसाठी विविध खेळ, अँपी थिएटर, फूड पार्क, खुले जिम अन् प्रशस्त पार्किंगची सुविधा देखील केली जाणार आहे. पंधरा एकर क्षेत्रावर शंभर कोटी रुपये खर्च करून हे दोन्ही पर्यटन पॉईट विकसित करण्यात येणार आहे. साधारणतः सर्व प्रक्रिया पूर्ण करून मार्च ते एप्रिलपर्यंत याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.