मुंबई : ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे धनाढ्य उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात रान उठवलेलं असताना ‘इंडिया’ आघाडीतले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज अहमदाबादेत जाऊन अदानी यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांनी दुसऱ्यांदा अदानी यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी ‘एनडीए’ला पाठिंबा द्यावा, असा मेसेज सत्ताधारी पक्षाचे शीर्षस्थ नेते देशातल्या मोठ्या उद्योगपतीच्याद्वारे देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. किंबहुना तशी शक्यता काँग्रेस नेत्यांनीही बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं.
उद्योगपती गौतम अदानी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी खास शरद पवार मुंबईहून अहमदाबादला गेले. या कार्यक्रमानंतर शरद पवार गौतम अदानी यांच्या निवासस्थानी गेले. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी पवार-अदानी भेटलेले असले तरी त्यांच्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.