लोणावळा : गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… चा जयघोष करत आज लोणावळा व मावळ तालुक्यात पाच दिवसांच्या बाप्पांना व गौराई मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पांच्या आगमनापासून घरोघरी बाप्पांची व दोन दिवसांपूर्वी घरात विराजमान झालेल्या गौराई मातेची मनोभावे पूजा करत त्यांचे आदेरतिथ्य केल्यानंतर आज बाप्पांना निरोप देण्यात आला. दुपारी बाप्पांना नैवद्य दाखवत आरती करत विसर्जन मिरवणूक सुरू करण्यात आली. ग्रामीण भागात ढोल ताश्याच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली होती. महिलांनी फुगड्या खेळत, फेर धरत, मंगळागौरीची गाणी म्हणत नृत्य सादर केले. अतिशय उत्साह व जल्लोष पुर्ण वातावरणामध्ये साश्रू नयनांनी बाप्पांना निरोप दिला.
लोणावळा शहरात लोणावळा धरण, वलवण तलाव, तुंगार्ली येथील हौद, हुडको येथील नगरपरिषदेचा हौद, खंडाळा, लोणावळा धरण आदी ठिकाणी तसेच वरसोली, वाकसई, देवघर, वाकसई चाळ, करंडोली, जेवरेवाडी, सदापूर, कार्ला, वेहेरगाव, दहीवली, मळवली, पाटण, भाजे, शिलाटणे, टाकले, भाजे, देवले, कुसगाव, ओळकाईवाडी या सर्व भागात मिरवणूका काढत बाप्पांना निरोप देण्यात आला.
लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने विसर्जनाच्या ठिकाणी फिरता बंदोबस्त ठेवला होता. शिवदुर्ग मित्रचे स्वंयसेवक देखील विसर्जन घाटावर तैनात होते. वलवण गावात अजय जाधव मित्र परिवाराच्या वतीने 5 हजार वडापाव भाविकांसाठी बनविण्यात आले होते. वलवण, नांगरगाव, डेनकर काॅलनी व अन्य भागातून विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना हे वडापाव मोफत वाटप करण्यात आले. उपक्रमांचे यंदाचे 11 वे वर्ष आहे.