हिंजवडी : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक महत्त्वाची ग्रामपंचायत असणारी आणि सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून नावलौकिक असणारी हिंजवडी ग्रामपंचायतची निवडणूक विविध अर्थाने गाजली. गणेशोत्सवा काळात ही निवडणूक काय झाडी… काय डोंगर… म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गुव्हाटीपर्यंत सदस्यांची पळवा पळवी करण्यात गाजली. हिंजवडीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने साम, दाम, दंड, भेद सर्व नितीचा वापर झाल्याने मोठी चुरस पाहायला मिळाली.
सरपंच पदाच्या निवडणुकीपूर्वी एका गटाच्या इच्छुकाने ग्रामपंचायत काही सदस्यांना कोल्हापूर – कणकवली-मुंबई- गुव्हाटी- कोलकत्ता- मुंबई असा खडतर प्रवास करून निवडणुकी दिवशी हिंजवडी येथे दाखल केले. याबाबत काही सदस्यांनी त्यांचा झालेला प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. त्यामुळे या घटनाक्रमात राज्यात शिंदे सरकारच्या सत्ता संघर्षात सर्वाधिक चर्चा झालेले काय झाडी… काय डोंगर… काय हॉटेल.. या डायलॉगने प्रसिद्ध आलेले गुहाटीची चर्चा पुन्हा हिंजवडी परिसरात गाजू लागली आहे.
सोमवारी दि. २५ सप्टेंबर रोजी अतिशय तणावपूर्ण वातावरणात हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मोठा गदारोळ व गोंधळ पाहायला मिळाला. खूपच सेन्सेटिव्ह व तणावाखाली झालेल्या निवडणुकीत अखेर गणेश जांभूळकर यांची दुसऱ्यांदा ९ विरुद्ध ७ आशा मताधिक्याने पुन्हा सरपंचपदी निवड झाली. त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार मयूर साखरे याने निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नायकवडी यांच्या समोरच गणेश जांभुळकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज फाडल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे विरोधी गटाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेळ संपल्याचा आरोप करत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळेतच अर्जाची पोच दिल्याने निवडणूक पुढे ढकलण्यास नकार दिला.
१७ पैकी एक सदस्य गैरहजर राहिल्याने दुपारी दीड वाजता उपस्थित १६ सदस्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये गणेश जांभुळकर यांना ९ मते तर मयूर साखरे यांना ७ मते मिळाली. या वेळी सचिव म्हणून प्रभारी ग्रामविकास अधिकारी बी. आर. पाटील व तलाठी सागर शेलार यांनी काम पाहिले.



