पिंपळे सौदागर :- उन्नति सोशल फाउंडेशनच्या पिंपळे सौदागर येथील महिलांच्या पहिल्या मानाच्या गणपतीचे वाजत गाजत मिरवणुकीद्वारे मंगळवारी विसर्जन कऱण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी असंख्य महिला कार्यकर्त्यांसह परिसरातील गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
मंगळवारी सायंकाळी मानाच्या गणपतीची यथासांग पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर उन्नति सोशल फाउंडेशन कार्यालयातून ढोल ताशांच्या निनादात महादेव मंदिर परिसरापर्यंत गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी २०२३ चे मानकरी महिंद्र बाळासाहेब झिंझुर्डे आणि विठ्ठल भिवाजी झिंझुर्डे यांच्या बैलजोड्या होत्या. मोरया ढोल ताशा, भद्राय ढोल ताशा पथक आणि आरंभ (परंपरा महाराष्ट्राची) यांच्या श्रवणीय वाद्यांमुळे परिसरात नवचैतन्य पसरले होते.
यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशन आणि चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ भिसे, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन आणि उन्नतीच्या महिला कार्यकर्त्या आदी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
आमदार अश्विनीताई जगताप म्हणाल्या, उन्नती सोशल फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे. पिंपळे सौदागर येथील महिला वर्ग उच्चभ्रू सोसायटीत राहणारा जरी असला तरी त्यांच्या अडी-अडचणी आणि समस्या वेगळ्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन नेहमी पुढाकार घेते. याशिवाय महापुरुषांच्या कार्याची जनजगृती, पर्यावरणपूरक उपक्रम, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे येथील नागरिकांच्या ते हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. हे कार्य आणखी नेटाने पुढे नेण्यासाठी गणपती बाप्पा चरणी पार्थना करते.
उन्नतीच्या नऊ दिवस चाललेल्या या गणेशोत्सवास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. आमदार अश्विनीताई जगताप, भाजप शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, मा. नगरसेविका उषा मुंढे, मा. नगरसेविका निर्मला कुटे, पवना सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन जयनाथ काटे, पिके स्कुलचे संस्थापक जग्गनाथ काटे, प्राध्यापिका धनश्री सोनवणे आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी या गणेश उत्सवात हजेरी लावली. दरम्यान प्रथेप्रमाणे यंदाही महिला पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, तृतीयपंथी यांना आरतीचा मान देण्यात आला. विशेष म्हणजे ‘रोबोट’नेही एक दिवस गणेशाची आरती केली. या गणेशोत्सवात पिंपळे सौदागरचे वातावरण मंगलमय झाले होते, अशी माहिती अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांनी दिली.




