पिंपरी : तळवडे औद्योगिक क्षेत्रासह आसपासच्या परिसराचा वेगाने विकास होत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या तळवडे परिसरास उपलब्ध असणाऱ्या चालू यंत्रणेतून वीज पुरवठा करणेकामी मर्यादा येत आहेत. त्यामुळे तळवडे एमआयडीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या ताब्यातील (कॅनबे चौक) जागा उपलब्ध करुन महावितरणाचे वीज उपकेंद्र उभारणी करिता जागा मिळण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी केली आहे.

यावरती तातडीने अजितदादा पवार यांनी एमएसईबी विभागाला केंद्र उभारणी व एमआयडीसी अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे तातडीने आदेश दिले. तळवडे परिसरात सद्यस्थितीत काही भागात वीजपुरवठा करणारी यंत्रणा खराब झालेली आहे. त्यामुळे तळवडे औद्योगिक परिसर व इतर रहिवासी भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना मुख्यत्वे करुन लघुउद्योजक यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा करणे तसेच भविष्यातील येणारी वीज मागणी पूर्ण करणेकामी कॅनबे चौक, तळवडे एमआयडीसी येथे वीज उपकेंद्र उभारणी करणे काळाची गरज आहे.
तसेच तळवडे औद्योगिक व आजूबाजूच्या परिसराचा विचार करुन प्रस्तावित नवीन उपकेंद्राचा प्रकल्प अहवाल महावितरण विभागाने तयार केलेला आहे. तथापि, त्यास जागा उपलब्ध झालेली नसल्याने अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कॅनवे चौक तळवडे येथील एमआयडीसीच्या ताब्यातील वाटप न केलेले भूखंड शिल्लक आहेत. परिसरास भविष्यातील वीज मागणी पूर्ण करण्यासाठी कॅनबे चौकात महावितरणच्या मागणीनुसार आवश्यक क्षमतेचा भूखंड वीज उपकेंद्र उभारणी करून महावितरणाचे वीज उपकेंद्र उभारणीचा प्रश्न सुटणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम क्रमांक २२ अ कलम ४० व महाराष्ट्र जमीन (शासकीय जमिनीची विल्हेवाट करणे) नियम १९७१ मधील नियम ५० मधील तसेच महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक जमीन ३/२०११/प्र.क्र / ५३/अ-१ दिनांक १२/०७/२०११ च्या तरतुदीनुसार कॅनबे चौक तळवडे येथिल एमआयडीसीच्या ताब्यातील भूखंडाची जागा महावितरण उपकेंद्र उभारणीसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळास आदेश द्यावेत अशी मागणी पंकज भालेकर यांनी अजितदादा यांच्याकडे केली आहे. त्यावर तातडीने निर्देश दिल्याने तळवडे परिसरातील विजेची समस्या सुटण्यासाठी मोठ्या उपाययोजना होणार आहे.



